शनिवार, ७ मार्च, २०२०

नसता ताप !


रोजच्याप्रमाणे सकाळचे क्लिनिक आटपून मी घरी आले. जेवण होऊन आडवे होईपर्यंत जवळजवळ तीन वाजत आले होते. जरा डोळा लागला असेल नसेल तेव्हढ्यात माझा मोबाईल वाजला.

"हाय डॉक, मी पम्मी बोलतेय, आरवची मम्मी.."

वयाच्या आणि नातेसंबंधांच्या मर्यादा झुगारून,"हाय डॉक" "हॅलो डॉक" अशा अमेरिकन स्टाईलने माझ्याशी बोलायला सुरुवात करणाऱ्या मॉड मम्मी-डॅडींचा एरवीही तसा मला रागच येतो. आज तर माझी झोपमोड झाल्यामुळे माझ्या डोक्यात सणकच गेली होती. पण तो राग गिळून, आवाज शक्य तितका शांत ठेऊन मी विचारले,

" काय गं ? काय झालेय?"

"डॉक, आज ना सक्काळपासून आरवला ताप आलाय असं वाटतंय. तस तो काल रात्रीपासूनच जरा किरकिर करतोय. काल ना आम्ही त्याला बड्डे पार्टीला घेऊन गेलो होतो. तिथे तो खूप खेळला. सगळ्यांनी त्याला घेतलं  म्हणून किरकिर करत असेल असं आम्हाला वाटलं. पण आज सकाळीही सारखा रडतोय. हातात घेतलं की शांत होतो. पण खाली ठेवलं की रड-रड सुरू आहे ."

आपल्या  बाळाला जरा काही त्रास झाला की त्वरित डॉक्टरांना फोन करणाऱ्या आणि नंतर तासा-तासागणिक बाळाच्या प्रकृतीबद्दल फोनवर अहवाल कळवत राहणाऱ्या, उच्चशिक्षित मम्म्यांची एक नवीन जमात निर्माण झाली आहे. अशीच एक मम्मी, तिचं  बोलणं मी ऐकते आहे की नाही याचा अंदाज न घेताच पलीकडून भडाभडा बोलत राहिली,

"आरव आज सकाळपासून खूप किरकिर करतोय. काही नीट खात नाहीये. रोज सकाळी नऊ वाजता मी त्याला रव्याची खीर देते. तो मोठ्ठा बाउल भरून खीर खातो. पण आज दोनच चमचे खाल्ली आणि मानाच फिरवायला लागला. परत बारा वाजता वरण भाताच्या वेळी त्यानं तसंच केलं. मग  त्याच्या आजीने त्याला तूप-मेतकूट-भात कालवून खायला घालण्याचा प्रयत्न केला. पण एक घासही नाही खाल्ला. त्याला मॅगी आवडतं, म्हणून मग आम्ही मॅगी करून दिलं. पण तेही खात नाहीये, हे पाहिल्यावर आम्हाला खूप टेन्शन आलं, म्हणून मी लगेच तुम्हाला फोन केला. सॉरी हं डॉक, तुम्हाला झोपेतून उठवलं... "

आपलं मूल मॅगी खायला नकार देतेय म्हणजे निश्चित आजारी आहे असा निष्कर्ष हल्लीच्या मम्म्यां काढतात आणि त्यांना टेन्शन येतं! पम्मी आणि तिची सासू या दोघींना आलेलं ते टेन्शन रास्त आहे की नाही, याचा अंदाज घेण्यासाठी मी पम्मीला प्रश्न विचारायला सुरुवात केली,

"आरवने सकाळपासून अंगावरचे दूध घेतलंय का? त्याला सर्दी खोकला आहे का?

"हो, अंगावरचे दूध घेतो आहे. सकाळपासून तो दोनदा विचित्र आवाजांत खोकला आणि त्याचं नाक सारखं गळतंय"

या असल्या मम्म्यां म्हणजे, "घट्ट पिवळा शेंबूड येतोय" "तीन वेळा मेंदीच्या रंगाची शी केली" "दोन वेळा दह्यासारखी उलटी काढली" असले विशेष तपशील देण्यात मोठ्ठ्या तरबेज असतात.

" बरं एक सांग, त्याला ताप आला आहे असं तुला नुसतं वाटतंय का ताप खरंच आला आहे?"

"त्याचे हातपाय थंड आहेत पण डोकं गरम लागतंय. अजून आम्ही तसा मोजला नाहीये. पण ताप आहे असं आई म्हणाल्या."

आत मात्र माझं डोकं गरम व्हायला लागलं होतं आणि माझा आवाजही चांगलाच तापला असावा.

" घरी थर्मोमीटर आहे ना? मग आत्तापर्यंत ताप का मोजला नाही?  खरंच ताप आहे की नाही, किती ताप आहे,   किती-किती वेळाने चढतोय, हे सर्व मला फोन करायच्या आधी बघायला नको का?"

"खरंय डॉक. पण आम्हाला इतकं टेन्शन आलं होतं ना की काही सुचलंच नाही. आई म्हणाल्या म्हणून मग मी तुम्हाला लगेच फोन केला. मी पाचच मिनिटात ताप मोजून पुन्हा फोन करते."

पम्मीने सासूचं नाव पुढे करत आपली सुटका करून घ्यायचा प्रयत्न केला. पण माझ्या आवाजातली धार तिला जाणवली असावी. त्यामुळे तिने घाईघाईने फोन बंद केला.

तिचा फोन येईपर्यंत पाच मिनिटे वर्तमानपत्रे चाळावीत आणि पम्मीचा फोन झाल्यावर पुन्हा झोपावे असा विचार करून मी वाचत पडले. पण बराच काळ झाला तरी तिचा फोन आला नाही. त्यामुळे वर्तमानपत्र वाचता-वाचता  माझा डोळा लागला, तर पुन्हा पम्मीचा फोन !

"डॉक, इतका वेळ आम्ही दोघी ना त्याचा ताप घ्यायचा प्रयत्न करत होतो.पण तो जाम घेऊच देत नव्हता. म्हणून आधी फोन करू शकले नाही. दुपारी त्याला सांभाळायला बाई येतात ना, त्या आल्यावर, आम्ही तिघींनी मिळून आरवला कसंबसं पकडलं आणि ताप मोजला. त्याला आत्ता ९९.२ ताप आहे. सॉरी हं डॉक. तुमच्या दुपारच्या विश्रांतीच्या वेळी मी तुम्हाला खूप त्रास देतेय"

मला कितीही त्रास झाला असला तरी, "हो बाई, तुझ्या फोनचा मला खरच  त्रास होतोय" असं मी काही म्हणू शकत नव्हते. त्यामुळे शांतपणे मी तिला आरवच्या तापाबद्दल सूचना द्यायला लागले,

"त्याचं अंग जरा नळाच्या पाण्याने पुसून घ्या. त्याला भरपूर पाणी पाजवा.  ताप १०० च्या वर जायला लागला तर लागेल तसे पॅरासिटॅमॉलचे डोस द्या. हलका ताप आहे. तो खात  नसला तरी अगदी झोपून नाहीये. त्यामुळे बहुतेक हवाबदलाचा ताप असावा. एक-दोन दिवसांत जाईल निघून. ताप फारच वाढायला लागला,  किंवा दोन दिवसांत नाहीच गेला, किंवा इतर काही लक्षणे दिसायला लागली, तर मला कळवा "

" संध्याकाळी त्याला एकदा क्लिनिकवर घेऊन येऊ का डॉक? एकदा  तुमचा हात लागला की आमचं टेन्शन उतरून जाईल"

जणू काही आरवचा ताप उतरण्यापेक्षा पम्मीचं आणि तिच्या सासूचं टेन्शन उतरणं जास्त महत्त्वाचे होते. त्यातून  तिने असा काही सूर लावला होता की माझा हात लागताच त्या आरवचा ताप आणि या दोघींचं टेन्शन उतरणार होतं.

" हलका ताप आहे आणि आरव अंगावरचे दूध  घेतोय. त्यामुळे इतकं टेन्शन घेण्यासारखे काही नाही. चोवीस तास तरी वाट बघा. नाहीच बरं वाटलं तर क्लिनिकला घेऊन या"

मी निक्षून सांगितल्यामुळे पम्मीने नाईलाजाने फोन ठेवला. पण त्या वेळेपासून पुढचे चोवीस तास तिने मला भलताच ताप दिला. दर तासागणिक व्हॅट्सऍप मेसेजेस पाठवत राहिली. तो मेसेज पाहून मी उत्तर दिले नाही की मग ती मला SMS वर तीच माहिती अथवा प्रश्न पाठवत राहिली. त्याला उत्तर दिले नाही की दर तीन-चार तासाने तिचा किंवा तिच्या सासूचा मला फोन येत राहिला. काही विचारू नका.

"डॉक, आरव आत्ता दोन वेळा खोकला. आता ताप ९९.४ आहे. एकदा उलटी झाली. अर्धच बिस्कीट खाल्लं. तीन शिंका आल्या. नाक बंद झालंय असं वाटतंय. ताप ९९.१ वर आलाय " अशी जणू रनींग कॉमेंट्रीच त्या पम्मीने चालू ठेवली होती.

इतकंच नव्हे तर या काळात पम्मीला आणि त्या आरवच्या पप्पांच्या मम्मीला पडलेले अनेक प्रश्न आणि शंका  विचारण्याचा त्या दोघीनीं सपाटा लावला होता.

"सगळे अंग पुसून घ्यायचे का फक्त कपाळावर पाण्याच्या पट्ट्या ठेवायच्या? त्या पाण्यात 'यु दी कोलोन' घालायचे का ? थर्मामीटर काखेत लावायचा का जांघेत? डिजिटल थर्मामीटर चांगला का मर्क्युरी थर्मोमीटर जास्त चांगला? ताप मोजताना डिजिटल थर्मामीटरच्या रीडिंगमध्ये एक मिळवायचा का वजा करायचा? पॅरासिटॅमॉलचे ड्रॉप्स जास्त चांगले का सिरप? अमुक कंपनीचं पॅरासिटॅमॉल चांगले का तमुक कंपनीचं जास्त चांगले? पॅरासिटॅमॉल पेक्षा स्ट्रॉंग औषध देऊ का? तापासाठी  होमिओपॅथीचे औषध दिलं तर चालेल का ? त्याचा ताप डोक्यात तर जाणार नाही ना? आरवच्या छातीला व्हिक्स लावू का?  ताप उतरावा म्हणून मॉलीशवाल्या बाईंनी अंगारा आणलाय, तो लावला तर चालेल का? त्याला दृष्ट लागल्यामुळे  ताप आला असेल का? आरवची दृष्ट काढू का ?

असले अनेक प्रश्न, कधी पम्मी आणि कधी पम्मीची सासू, फोनवर विचारत किंवा पाठवत राहिल्या.

शेवटी मी, "आरवला दाखवायला संध्याकाळी क्लिनिकला घेऊन या" असं सांगितल्यावरच फोनवरचा हा दुहेरी 'ताप' थांबला.

संध्याकाळी आरवला घेऊन पम्मी, पम्मीचा नवरा, त्याची मम्मी आणि आरवला सांभाळायला ठेवलेली बाई, असा संपूर्ण ताफा माझ्या क्लिनिकमध्ये पोहोचला. पम्मीच्या नवऱ्याच्या कडेवर आरवला छान आनंदात खिदळताना आणि खेळताना बघून मी म्हणाले,

"चांगला खेळतोय की. एखादा दिवस जरा वाट बघायची होतीत ना. गेला असता  ताप  निघून"

पम्मी जरा खजील झाली असं मला वाटलं, पण प्रत्यक्षांत मात्र भलत्याच कौतुकभऱ्या स्वरांत म्हणाली,

"नेहमी हा असंच  करतो. घरी आम्हा दोघींना अगदी घाबरवून सोडतो आणि इथे तुमच्यासमोर येऊन खेळतो. आमची अशी फजिती करतो. खरंय की नाही हो आई?"

सुनेने आपली साक्ष काढलेली पाहताच पम्मीच्या सासूनेही मानेने दुजोरा देत बोलण्याची सूत्रे आपल्या हातात घेतली.

"आहे ना ताप त्याला? तुमच्याकडे यायचं म्हणून मी मुद्दाम आत्ताचा पॅरासिटॅमॉलचा डोस त्याला दिला नाही"

मी आरवला तपासताना त्याला ताप असायला हवा, यासाठी पम्मीच्या सासूने ही दक्षता घेतली होती. तिच्या त्या हुशारीचं मी माफक कौतुक करावे, अशी तिची अपेक्षा असावी. पण अर्थातच तसं  काही घडले नाही. जणू त्याचा वचपा काढण्यासाठी, पुढची पाच मिनिटे पम्मीच्या सासूने, गेल्या चोवीस तासांतली आरवच्या तापाची गाथा, अनेक नवनवीन तपशिलांसह  माझ्यापुढे वाचली. पम्मीकडून मला आधीच मिळालेली सगळी माहिती, स्वतः सांगितल्यावरच पम्मीची सासू गप्प बसली. तिचे सगळे बोलणे मी लक्ष देऊन ऐकतेय, असे मी दाखवत राहिले. आणि डॉक्टरांनी माझं म्हणणे ऐकून घेतलं  याचं समाधान तिच्या चेहऱ्यावर झळकल्यावरच मी आरवला तपासायला लागले.

मी शांतपणे आरवला तपासत असताना, तो मात्र मासळीसारखा उसळत होता,खिदळत होता आणि खेळकरपणे आरडाओरडा करत होता.

"अगदी हलका ताप आहे. घाबरण्यासारखे काही वाटत नाहीये. मी कालपासून फोनवर सांगतेय त्याप्रमाणे हवाबदलाचा ताप आहे हा. याला आम्ही व्हायरल इन्फेक्शन असे म्हणतो. एक दोन दिवसांत व्हायरस बाळाच्या शरीरातून आपला आपणच निघून जातो. तसं झालं की ताप उतरून जाईल. त्याला भरपूर पाणी देत राहा. अंगावरचं दूध पाजवत राहा. सगळं खायला द्या. नेहमीपेक्षा थोडं कमी खाईल. पण एक दोन दिवसांत पूर्वीप्रमाणे खायला लागेल."

पुढच्या दहा मिनिटांत पम्मी आणि तिच्या सासूने, आधी फोनवर विचारलेले सगळे प्रश्न आणि अनेक नवीन उपप्रश्न विचारून माझ्या डोक्याला भलताच ताप दिला. हे सगळे झाल्यावर, पम्मीने अत्यंत स्मार्टपणे, तिच्या स्मार्टफोनवर, मला विचारण्यासाठी टिपून ठेवलेल्या प्रश्नांची यादी काढली. त्यात मला विचारून न झालेले एक दोन प्रश्न तिला मिळालेच. मग त्याची उत्तरे मी देणे हे ओघानेच आले.

" अँटिबायोटिक द्यायला नको का ? माझ्या फ्रेंडच्या मुलीला असाच ताप आला होता तेंव्हा तिच्या पेडियाट्रिशियनने जे अँटिबायोटिक दिले होते ते देऊन पाहायला काय हरकत आहे? "

मी "नको" असे उत्तर दिल्यावर,

" मग त्या पेडियाट्रिशियनने माझ्या फ्रेंडच्या मुलीला ते का दिले होते?'

मला अडचणीत टाकणारे असले प्रश्न विचारून आणि त्यांची समर्पक उत्तरे  द्यायला लावून पम्मीने माझी पुरती दमछाक केली.

हे सगळे झाल्यावर  सासूकडे बघत पम्मीने विचारले,

"आई आजून काही विचारायचं राहिलं नाही ना?"

पम्मीच्या सासूने नकारार्थी मान हलवल्यावर पम्मी नवऱ्याकडे वळाली,

"तुला काही विचारायचं आहे का? नंतर मग घरी गेल्यावर तुझ्या लक्षात येईल, त्यापेक्षा काही विचारायचे असल्यास आत्ताच काय ते विचार "

बायकोने केलेला हलकासा अपमान मूग गिळून सहन करत, पम्मीच्या नवऱ्याने नकारार्थी मान हालवली आणि मगच  पम्मी शांत झाली.

आरवचा ताप, पुढचे अठ्ठेचाळीस तास टिकला. पण त्या काळांत, पम्मीने आणि तिच्या सासूने फोनवर चालू ठेवलेल्या तापामुळे माझं डोकंच नाही तर माझा फोनही चांगलाच गरम होत होता.

चौथ्या दिवशी सकाळी-सकाळी मी साखरझोपेत असताना माझा फोन वाजला. पलीकडून पम्मी बोलत होती.

"डॉक सहा तास झाले. पण आरवला तापच नाही आला"

आत आरवला ताप न आल्याचे पम्मीला टेन्शन आले आहे असे वाटावे, असाच तिचा सूर होता!

" चांगले झाले ना मग. आता तरी तुझं टेन्शन गेलं ना? " मी विचारले

" हो तसं आत्तापुरतं गेलंय." असं म्हणून ती थांबली. मी डॉक्टर नसून एखादी ज्योतिषी असल्यासारखे तिने पुढे मला विचारले,

" परत आरवला ताप तर येणार नाही ना ? हा विचार करूनच आम्हाला दोघींना खूप टेन्शन येतंय. डॉक परत असा ताप येणार नाही ना त्याला ? "

वैद्यकीय शास्त्राच्या ऐवजी आपण ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करायला पाहिजे होता असा विचार माझ्या मनाला चाटून गेला. आत वैद्यकीय शास्त्राचा अभ्यास केलाच आहे तर निदानपक्षी या मॉडर्न मॉम्सच्या आणि त्यांच्या सासवांना येणारं "टेन्शन" या विषयावर  संशोधन करावे आणि टेन्शन येणार नाही किंवा आलेच तर ते लगेच घालवता येईल, यासाठी काही नामी उपाय शोधावा, असंही वाटून गेलं. पण हे आपलं सगळं मनातल्या मनांत. प्रत्यक्षात मात्र मी पम्मीला धीर देत म्हणाले,

"आता बरा झालाय ना तो. मग  कशाला उगीच काहीतरी विचार करताय ? आता तो नीट खायला लागेल.  त्याला भरपूर खायला प्यायला घाला. वेळच्यावेळी डोस द्यायला आणा म्हणजे झालं. "

आरवला ताप आलेला असतानाच्या तीन दिवसांच्या काळांत,  मला त्रास दिल्याबद्दल पम्मी फोनवर मला दहा वेळा सॉरी म्हणाली. त्या काळांत तिने आणि तिच्या सासूने दिलेला 'ताप', मी  शांतपणे सहन केल्याबद्दल, मला अनेक वेळा थँक्यू म्हणत, पम्मीने  फोन ठेवला.

मी हुश्श म्हणत पुन्हा निद्रादेवीच्या आधीन झाले असेन-नसेन इतक्यांत पुन्हा माझा फोन वाजला,

"हॅलो डॉक्टर, मी प्रेमची मम्मी बोलतेय. प्रेमला ना, काल रात्रीपासून ताप आलाय असं वाटतंय. ... "

माझ्या साखर झोपेचं पाणी पाणी झालं आणि  पुढचे बहात्तर तास पुन्हा एक "ताप" सहन करायला मी सज्ज झाले!










२ टिप्पण्या: