शनिवार, २९ फेब्रुवारी, २०२०

कपडे काढण्याचे पैसे!

मी बालरोगतज्ज्ञ झाले आणि दोन वर्षांत आमची बदली अलाहाबादला झाली. त्यावेळी अलाहाबाद अगदीच मागासलेले शहर होते. तिथल्या लोकांना स्री डॉक्टर ही फक्त स्त्रीरोगतज्ज्ञ अथवा प्रसूतीतज्ज्ञच असते असे वाटायचे. त्यामुळे, "इस बार माहवारी नही आई, आप हमें कुछ गोली-इंजेक्शन नहीं देंगे क्या? आप सिर्फ बच्चाको देखेंगी क्या?" असल्या प्रश्नांना उत्तरे देत बसावे लागायचे. कदाचित असेही असेल की बालरोगतज्ज्ञ नामक काही विशेष पदवी असते याची तिथल्या आम जनतेला त्यावेळी कल्पनाच नसावी. संपूर्ण अलाहाबादमध्ये त्यावेळी एखादे-दुसरेच बालरुग्णालय अस्तित्वात होते. सुरुवातीला मला बालरोगतज्ज्ञ म्हणून प्रॅक्टिस करायला जरा अडचण यायची. पण मी अलाहाबादच्या सिव्हिल लाईन्स या ठिकाणी माझी प्रॅक्टिस सुरू केली होती. माझ्या सुदैवाने तिथे उच्चशिक्षित व उच्चभ्रू लोकांची वस्ती होती. ते बालरोगतज्ज्ञांचे महत्त्व जाणून होते. त्यामुळे हळूहळू माझ्याकडे बालरूग्ण तपासणीसाठी आणले जाऊ लागले.

माझ्या दवाखान्याची वेळ मी सकाळी ९ ते दुपारी २ पर्यंत ठेवली होती. सुरुवातीला मी संध्याकाळीही जायचे. पण "हमारे यहां शामके वक्त बाहर निकलना महिलाओंके लिये असुरक्षित है| शामको आप बाहर मत निकला करिये|" असा प्रेमळ सल्ला मला तेथील अनेक हितचिंतकांनी दिला. त्यामुळे संध्याकाळी एखादा पेशंट असेल तर मी घरीच तपासणी करू लागले. अर्थात सुरूवातीच्या काळात सकाळचाही बराचसा वेळ पेशंट्स येण्याची वाट बघण्यातच जायचा, हेही खरे. माझ्या क्लिनिकमध्ये आणि घरीही टेलिफोन होता. त्यामुळे लोक फोन करूनही आपल्या बाळांना माझ्याकडे घेऊन यायचे. 

अलाहाबादला नोव्हेंबर ते जानेवारी अखेरपर्यंत कडक थंडी असायची. फेब्रुवारी महिन्यांत हळूहळू थंडी कमी व्हायला लागायची. थंडीत भूकही खूप लागायची. साधारण १९९३-९४ च्या फेब्रुवारी महिन्यातली ही गोष्ट असावी. मी सकाळपासून क्लिनीकमधे नुसतीच बसून होते. दोन वाजेपर्यंत भुकेने माझ्या पोटात कावळे ओरडू लागले होते. आता क्लिनीक बंद करून घरी जाऊन जेवावे, असा विचार करत असतानाच क्लिनीकचा फोन वाजला. "डाक्टर मैडम, आप अभी बैठी हैं क्या? हमारा बबुआ एक घंटेसे बहुतही रो रहा है| शांतही नहीं हो रहा| आप तनिक रूकिये, हम अभी आते है|"


माझ्या पोटात कावळे कोकलत असले तरीही त्यांच्या कोकलणाऱ्या बाळाला तपासण्याशिवाय मला पर्याय नव्हता. थोड्याच वेळात एका मोठ्या गाडीतून बाळाला घेऊन बाळाचे आई-वडील आणि आजी-आजोबा आले. बाळ बेंबीच्या देठापासून केकाटत होते. मी एक-दोन वर्षांपूर्वींच बालरोगतज्ज्ञ झालेले असल्याने माझे पुस्तकी ज्ञान ताजे होते. त्यामुळे बाळाला मेंदूज्वर, मेंदूतील रक्तस्त्राव, सेप्सिस किंवा इतर काही गंभीर आजार झाला असावा, असा अंदाज मी मनातल्या मनात केला. असला कुठला गंभीर आजार बाळाला असल्यास, त्याला कुठे ऍडमिट करायचे? आणि अपुऱ्या वैद्यकीय सेवा असलेल्या या शहरात बाळाचा इलाज कसा काय करायचा? या भीतिने माझ्या पोटात गोळा उठला. तरीही मनावर काबू ठेवत मी बाळाला तपासण्यासाठी टेबलवर ठेवायला सांगितले आणि बाळाच्या आईला बाळाचे कपडे काढायला सांगितले.

बाळ रडत असल्याने त्यांच्यापैकी कोणालाच काही सुचत नव्हते. बाळाचे रडणे थांबावे यासाठी बाळाचे बाबा बाळाच्या कानाजवळ खुळखुळा वाजवत होते, आजोबा टाळ्या वाजवत होते आणि आजी तोंडाने वेगवेगळे आवाज काढून दाखवत होती. बाळ रडत होते आणि उसळ्या मारत होते. भांबावलेल्या आईला बाळाचे कपडे काही पटापटा काढता येईनात. मग तिला बाजूला सारून मीच ते काम हाती घेतले. एकेक करून मी बाळाचे कपडे काढायला सुरुवात केली. एकावर एक असे तीन-चार स्वेटर्स, दोन लांब हाताची झबली, एक सुती आणि दोन लोकरीच्या टोप्या काढल्यावर बाळाच्या अंगावर एक सुती बंडी फक्त उरली. गंमत म्हणजे जसजसे मी एकेक आवरण काढत गेले तसतसे बाळ हळूहळू शांत होत गेले व शेवटी चक्क हसायला लागले. तरीही आपल्याकडून वैद्यकीयदृष्ट्या काही राहायला नको हे मनात ठेवून मी त्या बाळाला नीट तपासले. थंडी कमी झालेली असतानाही बाळाला आवश्यकतेपेक्षा जास्त गरम कपडे घातलेले असल्यानेच बाळ रडत होते हे निश्चित झाले. त्यामुळे फक्त त्या बाळाचे कपडे काढण्याचे पैसे मला मिळणार आहेत हे मला समजले. संपूर्ण तपासणी केल्यावर बाळाला विशेष काहीही झालेले नसल्याची ग्वाही मी त्यांना दिली. त्याशिवाय बाळाच्या स्वच्छतेबाबत, लसीकरणाबाबत व आहाराबद्दल सल्लाही दिला. तसेच, आता थंडी ओसरू लागली आहे, त्यामुळे बाळाला फारसे गरम कपडे घालण्याची आवश्यकता नाही हे सांगून, माझी तपासणी-फी घेऊन त्यांची बोळवण केली.

सांगायचा मुद्दा असा की आता फेब्रुवारी महिना संपलाच आहे. तशीही आपल्याकडे फारशी थंडी पडतच नाही. आता तर चांगलच गरम व्हायला लागले आहे. त्यामुळे तुमच्या बाळाला जरूरीपेक्षा जास्त गरम कपडे घालू नका आणि ते कपडे काढण्यासाठी माझ्याकडे आणून माझा खिसा गरम करू नका !

१४ टिप्पण्या:

  1. Funny but true. It happens 👍😁
    त्यांनी खळखळ न करता पैसे दिले हे खूपच छान

    उत्तर द्याहटवा
  2. छान अनुभव. पण आश्चर्य म्हणजे आजी आजोबांना सुद्धा कपडे काढायचे लक्षात आले नाही. काळजीमुळे सुचले नसेल त्यांना
    कदाचित

    उत्तर द्याहटवा
  3. आणि सहज सुंदर लिखाण तुझे.. डोळ्यापुढे प्रसंग उभा केलास

    उत्तर द्याहटवा
  4. सहज सुंदर लिखाण. डोळ्यापुढे प्रसंग उभा केला

    उत्तर द्याहटवा
  5. हा हा हा मजा आली वाचून ! पण बाळ रडायला लागलं म्हणजे सगळ्या घराचा जीव टांगणीला लागतो . Enjoy keep writting

    उत्तर द्याहटवा
  6. क्या बात है ,स्वाती! गंमत आहे. मजेदार किस्सा!आमच्या colony त असाच किस्सा घडला.अगं सोलापूरसारख्या ठिकाणी एकावर एक असे दोन synthetic कपडे घालून socks घातले होते. बाळं तुफान रडत होतं. सगळे कपडे काढल्यावर दमलेलं बाळ दोन मिनीटात झोपलं.

    उत्तर द्याहटवा
  7. मजेदार किस्सा, वाचताना गम्मत वाटली.
    नक्किच त्या बाळाने तुला धन्यावाद दिले असणार

    उत्तर द्याहटवा