मी बालरोगतज्ज्ञ झाल्यानंतर पहिली पाच वर्षे, प्रथम उधमपूरला व नंतर अलाहाबादला प्रॅक्टिस करत होते. त्यानंतर, आता गेली सत्तावीस वर्षे माझी पुण्यात प्रॅक्टीस आहे. या संपूर्ण काळांत बालरुग्णांच्या पालकांचे अनेक नमुने मला बघायला मिळाले. त्यातला एक खास नमुना म्हणजे, एका डॉक्टरांकडून दुसऱ्या डॉक्टरकडे फिरणारे 'फिरस्ते' पालक.
सगळयाच डॉक्टरांना अशा 'फिरस्त्यांचा' अनुभव थोड्याफार प्रमाणात येत असेल. या फिरस्त्यांमध्ये अनेक उपजाती आहेत. त्यातल्या त्यात एका निरुपद्रवी जातीच्या फिरस्त्यांना मी "विंडो शॉपर्स" असे नाव दिले आहे. एखाद्या दुकानात मिळणाऱ्या वस्तू बाहेरच्या शोकेसमध्ये ठेवलेल्या असतात. त्यांवर किंमतीची लेबलेही चिकटवलेली असतात. अशा दुकानांमध्ये 'विंडो शॉपिंग' सहजी जमू शकते. पण दवाखान्यात मात्र तसे नसते. फार तर आम्ही आमच्या 'तपासणी फी' चे दर दर्शनी भागांत लावतो. पण आमच्याकडे मिळणाऱ्या प्रत्येक सेवेचे दर दर्शवणारा फलक असतोच असे नाही .
माझ्या क्लिनिकमध्ये आल्याआल्या, समोरच माझ्या सेक्रेटरीचे टेबल आहे. ती कोणाशी बोलत असेल तर त्यांचा संवाद अस्पष्टपणेच, पण माझ्या केबिनमध्ये ऐकू येतो. कधीतरी तो संवाद ऐकून बाहेर कोणी 'विंडोशॉपर्स' आल्याचा अंदाज मला लागतो. अशावेळी तो संवाद साधारण या स्वरूपाचा असतो.
"मॅडम आहेत का दवाखान्यात?"
"हो आहेत ना. आत बसल्या आहेत"
"आज पेशंट नाहीत का त्यांच्याकडे?"
"आत्ताच संपले."
"रोज किती पेशन्ट तपासतात?"
"ते पेशंट येण्यावर आहे. तुम्हाला काय हवं आहे? तुमच्या बाळाला दाखवायचे आहे का?"
"दाखवायचे आहे. पण मॅडम चांगल्या तपासतात ना?"
"हो. नीट तपासतात."
"फी किती घेतात ?"
"पहिल्या वेळच्या तपासणीला अमुक इतकी, फेरतपासणीची तितकी आणि वेगवेगळ्या लसीकरणाची फी लसीच्या किंमतीप्रमाणे वेगवेगळी."
"तपासणी फीमध्ये सूट मिळते का? अमुक-तमुक लसीची किंमत किती असते? मॅडमना भेटून विचारू का ?"
त्यांच्या प्रश्नांच्या फैरींना अगदी समर्पक उत्तरे द्यायला माझी सेक्रेटरी सरावलेली असल्यामुळे, ती या 'विंडोशॉपर्स' फिरस्त्यांना माझ्यापर्यंत येऊच देत नाही.
त्यानंतर इतर बरेच प्रश्न विचारून झाल्यावर, हे 'विंडोशॉपर्स' "बाळाला घेऊन येतो" असे सांगून गायब होतात. ते परत येण्याची शक्यता नाही याची मला जवळजवळ खात्रीच असते.
फिरस्त्यांमधली आणखी एक पोटजात म्हणजे 'नाविन्योत्सुक' फिरस्ते. हे फिरस्ते आपल्या बाळाला घेऊनच माझ्या दवाखान्यात येतात. नावनोंदणी करून, नवीन केसपेपर बनवून ते माझ्या केबिनमध्ये येतात. अमुक-तमुक मित्राने किंवा आप्ताने तुम्हाला दाखवायला सांगितले, म्हणून तुमच्याकडे आलो, अशी प्रस्तावना करतात.
मी विचारते, "बाळाला काय होतंय?"
"तीन दिवस झाले खूप ताप येतोय"
"बाळाच्या नेहमीच्या डॉक्टरांना दाखवलंय का? त्यांची काही औषधे चालू आहेत का?"
"त्यांना कालच दाखवलंय. पण त्यांच्या औषधांनी ताप उतरत नाहीये. म्हणून मित्राने तुमच्याकडे दाखवायला सांगितलंय."
त्यांच्याकडे असलेल्या जुन्या फाईल्स मी चाळायला सुरु करते. दर दोन-तीन महिन्यांनी नवीन बालरोगतज्ज्ञ, या हिशोबाने, अनेक डॉक्टरांनी लिहिलेल्या औषधांच्या चिठ्ठया मला मिळतात. त्यांच्या 'नेहमीच्या', (म्हणजेच गेल्या दोन-तीन महिन्यांतल्या) बालरोगतज्ज्ञांच्या चिठ्ठीप्रमाणे बाळाला काही औषधे चालू असतात. त्यांच्या बाळाची व्यवस्थित तपासणी केल्यानंतर मी सांगते,
"तुमच्या डॉक्टरांनी जी औषधे चालू केली आहेत ती योग्यच आहेत. आता आपण बदलायला नको. याच औषधांनी एखाद्या दिवसांत बाळाला बरे वाटेल."
माझे उत्तर ऐकून या प्रकारच्या फिरस्त्यांचा चेहरा पडतो. पण हे लोक असे सहजी हार मानणारे नसतात.
"पण कालपासून तीच औषधे आम्ही देतोय. अजून काहीच फरक पडलेला नाहीये. आता आम्ही या डॉक्टरांच्याकडे परत जाणारच नाही. नेहमीसाठी तुमच्याकडेच बाळाची ट्रीटमेंट ठेवणार. तुम्ही आता तुमच्या हिशोबाने औषधे द्या"
सध्या चालू असलेल्या औषधांमुळे बाळाला आराम पडणार आहे याची मला खात्री असते. या 'नाविन्योत्सुक' फिरस्त्यांच्या आग्रहाखातर औषध बदलणे, आणि आधीच्या डॉक्टरांच्या वैद्यकीय ज्ञानाचा अनादर करणे मला अयोग्य वाटते. तसेच, केवळ पेशंटची मर्जी राखण्यासाठी, चालू असलेल्या औषधाचीच, पण दुसऱ्या एखाद्या कंपनीची बाटली लिहून देण्याची लबाडी मी कधीच करत नाही.
"सध्या चालू असलेले औषध बदलू नका" असे मी निक्षून सांगितल्यावर, या 'नाविन्योत्सुक' फिरस्त्यांची घोर निराशा होते. ते माझ्याकडे पुन्हा फिरकत नाहीत, हे सांगायला नकोच!
फिरस्त्यांमधली एक उपजमात अतिशय बेरकी असते. 'परीक्षक फिरस्ते' किंवा 'संशयात्मा फिरस्ते' असे त्यांचे नामकरण मी केलेले आहे. हे फिरस्ते वरकरणी अगदी साधे-भोळे वाटतात. नावनोंदणी करून, नवीन केसपेपर बनवून आपल्या बाळाला घेऊनच ते माझ्याकडे येतात.
त्यांच्या त्या खेळकर बाळाला फारसे काही झाले नसावे, असे मला प्रथमदर्शनी तरी वाटते. तरीही शास्त्रशुद्ध तपासणी पद्धतीप्रमाणे, "बाळाला काय त्रास आहे?" असे मी विचारते. त्यावर, "बाळाला काहीच त्रास नाहीये" असे उत्तर मिळाल्यामुळे मी बुचकळ्यातच पडते.
"बाळाला काही त्रास नाहीये, तर तुम्ही का आला आहात? तुम्हाला कोणी डॉक्टरांनी माझ्याकडे पाठवलंय का? तुमच्याकडे आधीच्या औषधाच्या चिठ्ठ्या, काही रिपोर्ट्स वगैरे आहेत का?"
अशा प्रश्नांनाही काही नीटसं उत्तर मिळत नाही.
त्यानंतर, मी बाळाची व्यवस्थित तपासणी करते. हृदयाला भोक, पोटातली गाठ, अशी वरकरणी न दिसणारी व्याधी असण्याची शक्यता जर मला वाटली, तर त्या अनुषंगाने बोलणे पुढे चालू होते. समजा, एखाद्या बाळाच्या हृदयाला भोक आहे असे निदान जर मी केले, तर आमचा पुढील संवाद साधारण असा असतो.
"बाळाच्या हृदयाला भोक असण्याची शक्यता आहे. बाळाची 2D Echocardiography करावी लागेल. ती तपासणी झाली की रिपोर्ट घेऊन माझ्याकडे या. मग पुढे काय करायचे ते आपण ठरवू"
माझे हे बोलणे ऐकताच बाळाच्या आई-वडिलांची नेत्रपल्लवी होते. मग त्यांच्या भल्यामोठ्या पिशवीतून, आदल्या दिवशीच केलेला 2D Echocardiography चा रिपोर्ट बाहेर निघतो. त्यांच्या नेहमीच्या डॉक्टरांनी, कुणा नामवंत हृदयरोगतज्ज्ञांसाठी लिहिलेली चिठ्ठीदेखील त्या रिपोर्टला जोडलेली असते.
मग मी आश्चर्यचकित होऊन त्यांना विचारते, "अहो, बाळाच्या हृदयाला भोक आहे, असे निदान कालच झालेले दिसते आहे. मग तुम्ही माझ्याकडे का आलात? तुमच्या डॉक्टरांनी हृदयरोगतज्ज्ञांसाठी चिठ्ठीही लिहिलेली आहे. सरळ त्यांच्याकडेच जायचे होते ना"
"मॅडम, तुमचं म्हणणे खरे आहे. पण आम्हाला तुमचे सेकंड ओपिनियन घ्यायचे होते."
"सेकंड ओपिनियन घ्यायला काहीच हरकत नाही, पण तुम्ही मला आधीच तसे मोकळेपणाने सांगायचे होते ना?'
"तुम्हाला आधी सांगावे, असे आम्हाला एकदा वाटले होते. पण मग आम्ही असा विचार केला की, जर का तुम्हाला आधीच निदान कळलं, तर बाळाची तपासणी करून, तुम्ही आम्हाला पुन्हा तेच निदान सांगणार. म्हणून आधी तुम्हाला काहीच बोललो नाही."
तुम्हाला योग्य निदान करता येतंय की नाही, याची आम्ही परीक्षा बघत होतो, इतकंच बोलायचं ते बाकी ठेवतात. मनातला पराकोटीचा राग मुकाट्याने गिळून मी शांतपणे पुढे म्हणते,
"बरं, आता झालं ते राहू दे. तुम्ही या हृदयरोगतज्ज्ञांना दाखवून घ्या."
"नको मॅडम, तुम्ही दुसऱ्या कोणाचे नाव सुचवा ना..."
"तुमच्या बालरोगतज्ज्ञांनी ज्यांच्यासाठी चिठ्ठी दिली आहे त्यांच्याकडे जा. ते चांगले हृदयरोगतज्ज्ञ आहेत."
तरीही दुसऱ्याच कोणा हृदयरोगतज्ज्ञांसाठी मी चिठ्ठी द्यावी याचा ते आग्रह धरतात. अर्थातच मी त्यांना बधत नाही. तीन चार हृदयरोगतज्ज्ञांची नावे सांगून, यापैकी कोणाहीकडे जा, असे सांगून मी त्यांची बोळवण करते.
त्यानंतर एक-दोन महिने निघून जातात. त्या 'परीक्षक किंवा संशयात्मा फिरस्त्यां' चा मला तोपर्यंत विसर पडलेला असतो. एक दिवस पुन्हा तेच पालक माझ्याकडे येतात. मधल्या काळात त्यांनी अजून एक-दोन बालरोगतज्ज्ञ व त्यांनी सुचवलेल्या आणखी काही हृदयरोगतज्ज्ञांचीही ओपिनिअन्स घेतलेली असतात. त्यातल्या एक-दोघां तज्ञांनी, आधीच झालेल्या सर्व तपासण्या व काही नवीन तपासण्याही करून घेतलेल्या असतात. "बाळाच्या हृदयात असलेले भोक ऑपरेशन करून बंद करावे लागेल", असाच सल्ला सर्व हृदयरोगतज्ज्ञांनी दिलेला असतो. त्यामुळे साहजिकच मी त्यांना विचारते,
"आता ऑपरेशन करावे लागणार, हे तर निश्चितच झाले आहे ना? मग पुन्हा तुम्ही माझ्याकडे का आला आहात?'
"मॅडम, आम्ही दोन-तीन हृदयरोगतज्ज्ञांची ओपिनिअन्स घेतली. ऑपरेशन करावे लागणार असे सगळयांनी सांगितले. पण कोणाकडून आणि कुठे ऑपरेशन करून घ्यावे, हे तुम्ही सांगा."
सगळीकडे फिरून आल्यावर आता पुन्हा हे लोक माझं डोकं खाणार, या विचारांनी माझं डोकं चांगलंच तापतं.
कोणाकडून आणि कुठल्या हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन करून घ्यावे, हे ठरवण्यासाठी तुम्ही अजून चार-पाच ओपिनियन्स घ्या, असा सल्ला त्यांना देण्याचा दुष्ट विचार माझ्या मनात येतो.
पण हीच ती वेळ असते जेंव्हा 'डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेऊन वैद्यकीय व्यवसाय करावा', हा माझ्या शिक्षकांचा सल्ला मला आठवतो. त्यामुळे मी त्या दुष्ट विचारांना आळा घालते. विचारमग्न झाल्याचे नाटक करते. त्यादरम्यान आलेला राग शांत करते, आणि त्यांना सांगते,
"अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज हॉस्पिटल, ऑपरेशनसाठी येणारा खर्च, तुमचा वैद्यकीय विमा, इत्यादी सर्व बाबी विचारात घेऊन काय तो निर्णय घ्या म्हणजे झाले."
त्यानंतर मात्र, अगदी महत्त्वाचे काहीतरी सांगत आहे असा आव आणून मी पुढे म्हणते,
"बाळाच्या हृदयाला भोक असल्याचे निदान ज्या बालरोगतज्ज्ञांनी सर्वात आधी केले होते, ते निष्णात बालरोगतज्ज्ञ आहेत. ऑपरेशननंतर तुम्ही नेहमी त्यांच्याकडेच बाळाला दाखवत राहा." असे सांगून मी या 'संशयात्म्यां'पासून स्वतःची सुटका करून घेते.
आपला नेहमीचा भाजीवाला, किराणा दुकानदार, शिंपी हेदेखील आपण बदलत नाही. पण हे 'फिरस्ते' पेशंट मात्र सतत डॉक्टर्स कसे काय बदलत राहतात, याचे मला राहून-राहून आश्चर्य वाटते.