शुक्रवार, २४ मार्च, २०२३

फिरस्ते!

मी बालरोगतज्ज्ञ झाल्यानंतर पहिली पाच वर्षे, प्रथम उधमपूरला व नंतर अलाहाबादला प्रॅक्टिस करत होते. त्यानंतर, आता गेली सत्तावीस वर्षे माझी पुण्यात प्रॅक्टीस आहे. या संपूर्ण काळांत बालरुग्णांच्या पालकांचे अनेक नमुने मला बघायला मिळाले. त्यातला एक खास नमुना म्हणजे, एका डॉक्टरांकडून दुसऱ्या डॉक्टरकडे फिरणारे 'फिरस्ते' पालक. 


सगळयाच डॉक्टरांना अशा 'फिरस्त्यांचा' अनुभव थोड्याफार प्रमाणात येत असेल. या फिरस्त्यांमध्ये अनेक उपजाती आहेत. त्यातल्या त्यात एका निरुपद्रवी जातीच्या फिरस्त्यांना मी "विंडो शॉपर्स" असे नाव दिले आहे. एखाद्या दुकानात मिळणाऱ्या वस्तू बाहेरच्या शोकेसमध्ये ठेवलेल्या असतात. त्यांवर किंमतीची लेबलेही चिकटवलेली असतात. अशा दुकानांमध्ये 'विंडो शॉपिंग' सहजी जमू शकते. पण दवाखान्यात मात्र तसे नसते. फार तर आम्ही आमच्या 'तपासणी फी' चे दर दर्शनी भागांत लावतो. पण आमच्याकडे मिळणाऱ्या प्रत्येक सेवेचे दर दर्शवणारा फलक असतोच असे नाही . 

माझ्या क्लिनिकमध्ये आल्याआल्या, समोरच माझ्या सेक्रेटरीचे टेबल आहे. ती कोणाशी बोलत असेल तर त्यांचा संवाद अस्पष्टपणेच, पण माझ्या केबिनमध्ये ऐकू येतो. कधीतरी तो संवाद ऐकून बाहेर कोणी 'विंडोशॉपर्स' आल्याचा अंदाज मला लागतो. अशावेळी तो संवाद साधारण या स्वरूपाचा असतो. 

"मॅडम आहेत का दवाखान्यात?"

"हो आहेत ना. आत बसल्या आहेत"

"आज पेशंट नाहीत का त्यांच्याकडे?"

"आत्ताच संपले."

"रोज किती पेशन्ट तपासतात?"

"ते पेशंट येण्यावर आहे. तुम्हाला काय हवं आहे? तुमच्या बाळाला दाखवायचे आहे का?"

"दाखवायचे आहे. पण मॅडम चांगल्या तपासतात ना?"

"हो. नीट तपासतात."

"फी किती घेतात ?"

"पहिल्या वेळच्या तपासणीला अमुक इतकी, फेरतपासणीची तितकी आणि वेगवेगळ्या लसीकरणाची फी लसीच्या किंमतीप्रमाणे वेगवेगळी."

"तपासणी फीमध्ये सूट मिळते का? अमुक-तमुक लसीची किंमत किती असते? मॅडमना भेटून विचारू का ?"

त्यांच्या प्रश्नांच्या फैरींना अगदी समर्पक उत्तरे द्यायला माझी सेक्रेटरी सरावलेली असल्यामुळे, ती या 'विंडोशॉपर्स' फिरस्त्यांना  माझ्यापर्यंत येऊच देत नाही.

त्यानंतर इतर बरेच प्रश्न विचारून झाल्यावर, हे 'विंडोशॉपर्स'  "बाळाला घेऊन येतो" असे सांगून गायब होतात. ते परत येण्याची शक्यता नाही याची मला जवळजवळ खात्रीच असते. 

फिरस्त्यांमधली आणखी एक पोटजात म्हणजे 'नाविन्योत्सुक' फिरस्ते. हे फिरस्ते आपल्या बाळाला घेऊनच माझ्या दवाखान्यात येतात. नावनोंदणी करून, नवीन केसपेपर बनवून ते माझ्या केबिनमध्ये येतात. अमुक-तमुक मित्राने किंवा आप्ताने तुम्हाला दाखवायला सांगितले,  म्हणून  तुमच्याकडे आलो, अशी प्रस्तावना करतात.

मी विचारते, "बाळाला काय होतंय?" 

"तीन दिवस झाले खूप ताप येतोय"

"बाळाच्या नेहमीच्या डॉक्टरांना दाखवलंय का?  त्यांची काही औषधे चालू आहेत का?"

"त्यांना कालच दाखवलंय. पण त्यांच्या औषधांनी ताप उतरत नाहीये. म्हणून मित्राने तुमच्याकडे दाखवायला सांगितलंय."
 
त्यांच्याकडे असलेल्या जुन्या फाईल्स मी चाळायला सुरु करते. दर दोन-तीन महिन्यांनी नवीन बालरोगतज्ज्ञ, या हिशोबाने, अनेक डॉक्टरांनी लिहिलेल्या औषधांच्या चिठ्ठया मला मिळतात. त्यांच्या 'नेहमीच्या', (म्हणजेच गेल्या दोन-तीन महिन्यांतल्या) बालरोगतज्ज्ञांच्या चिठ्ठीप्रमाणे बाळाला काही औषधे चालू असतात. त्यांच्या बाळाची व्यवस्थित तपासणी  केल्यानंतर मी सांगते,

"तुमच्या डॉक्टरांनी जी औषधे चालू केली आहेत ती योग्यच आहेत. आता आपण बदलायला नको. याच औषधांनी एखाद्या दिवसांत बाळाला बरे वाटेल."

माझे उत्तर ऐकून या प्रकारच्या फिरस्त्यांचा चेहरा पडतो. पण हे लोक असे सहजी हार मानणारे नसतात.

"पण कालपासून तीच औषधे आम्ही देतोय. अजून काहीच फरक पडलेला नाहीये. आता आम्ही या डॉक्टरांच्याकडे परत जाणारच नाही. नेहमीसाठी तुमच्याकडेच बाळाची ट्रीटमेंट ठेवणार. तुम्ही आता तुमच्या हिशोबाने औषधे द्या"

सध्या चालू असलेल्या औषधांमुळे बाळाला आराम पडणार आहे याची मला खात्री असते. या 'नाविन्योत्सुक' फिरस्त्यांच्या आग्रहाखातर औषध बदलणे, आणि आधीच्या डॉक्टरांच्या वैद्यकीय ज्ञानाचा अनादर करणे मला अयोग्य वाटते. तसेच, केवळ पेशंटची मर्जी राखण्यासाठी, चालू असलेल्या औषधाचीच, पण दुसऱ्या एखाद्या कंपनीची बाटली लिहून देण्याची लबाडी मी कधीच करत नाही. 
"सध्या चालू असलेले औषध बदलू नका" असे मी निक्षून सांगितल्यावर, या 'नाविन्योत्सुक' फिरस्त्यांची घोर निराशा होते. ते माझ्याकडे पुन्हा फिरकत नाहीत, हे सांगायला नकोच!

फिरस्त्यांमधली एक उपजमात अतिशय बेरकी असते. 'परीक्षक फिरस्ते' किंवा 'संशयात्मा फिरस्ते' असे त्यांचे  नामकरण मी केलेले आहे. हे फिरस्ते वरकरणी अगदी साधे-भोळे वाटतात. नावनोंदणी करून, नवीन केसपेपर बनवून आपल्या बाळाला घेऊनच ते  माझ्याकडे येतात. 
 
त्यांच्या त्या खेळकर बाळाला फारसे काही झाले नसावे, असे मला प्रथमदर्शनी तरी वाटते. तरीही शास्त्रशुद्ध तपासणी पद्धतीप्रमाणे, "बाळाला काय त्रास आहे?" असे मी विचारते. त्यावर, "बाळाला काहीच त्रास नाहीये" असे उत्तर मिळाल्यामुळे  मी बुचकळ्यातच पडते.  

"बाळाला काही त्रास नाहीये, तर तुम्ही का आला आहात? तुम्हाला कोणी डॉक्टरांनी माझ्याकडे पाठवलंय का? तुमच्याकडे आधीच्या औषधाच्या चिठ्ठ्या, काही रिपोर्ट्स  वगैरे आहेत का?" 

अशा प्रश्नांनाही काही नीटसं उत्तर मिळत नाही.

त्यानंतर, मी बाळाची व्यवस्थित तपासणी करते. हृदयाला भोक, पोटातली गाठ, अशी वरकरणी न दिसणारी व्याधी असण्याची शक्यता जर मला वाटली, तर त्या अनुषंगाने बोलणे पुढे चालू होते. समजा, एखाद्या बाळाच्या हृदयाला भोक आहे असे निदान जर मी केले, तर आमचा पुढील संवाद साधारण असा असतो. 

"बाळाच्या हृदयाला भोक असण्याची शक्यता आहे. बाळाची 2D Echocardiography करावी लागेल. ती तपासणी झाली की रिपोर्ट घेऊन माझ्याकडे या. मग पुढे काय करायचे ते आपण ठरवू"

माझे हे बोलणे ऐकताच बाळाच्या आई-वडिलांची नेत्रपल्लवी होते. मग त्यांच्या भल्यामोठ्या  पिशवीतून, आदल्या दिवशीच केलेला 2D Echocardiography चा रिपोर्ट बाहेर निघतो. त्यांच्या नेहमीच्या डॉक्टरांनी, कुणा नामवंत हृदयरोगतज्ज्ञांसाठी लिहिलेली चिठ्ठीदेखील त्या रिपोर्टला जोडलेली असते. 

मग मी आश्चर्यचकित होऊन त्यांना विचारते, "अहो, बाळाच्या हृदयाला भोक आहे, असे निदान कालच झालेले दिसते आहे. मग तुम्ही माझ्याकडे का आलात? तुमच्या डॉक्टरांनी हृदयरोगतज्ज्ञांसाठी चिठ्ठीही लिहिलेली आहे. सरळ त्यांच्याकडेच जायचे होते ना" 

"मॅडम, तुमचं म्हणणे खरे आहे. पण आम्हाला तुमचे सेकंड ओपिनियन घ्यायचे होते."

"सेकंड ओपिनियन घ्यायला काहीच हरकत नाही, पण तुम्ही मला आधीच तसे मोकळेपणाने सांगायचे होते ना?'

"तुम्हाला आधी सांगावे, असे आम्हाला एकदा वाटले होते. पण मग आम्ही असा विचार केला की, जर का तुम्हाला आधीच निदान कळलं, तर बाळाची तपासणी करून, तुम्ही आम्हाला पुन्हा तेच निदान सांगणार. म्हणून आधी तुम्हाला काहीच बोललो नाही."

तुम्हाला योग्य निदान करता येतंय की नाही, याची आम्ही परीक्षा बघत होतो, इतकंच बोलायचं ते बाकी ठेवतात. मनातला पराकोटीचा राग मुकाट्याने गिळून मी शांतपणे पुढे म्हणते,

"बरं, आता झालं ते राहू दे. तुम्ही या हृदयरोगतज्ज्ञांना दाखवून घ्या."

"नको मॅडम, तुम्ही दुसऱ्या कोणाचे नाव सुचवा ना..."

"तुमच्या बालरोगतज्ज्ञांनी ज्यांच्यासाठी  चिठ्ठी दिली आहे त्यांच्याकडे जा. ते चांगले हृदयरोगतज्ज्ञ आहेत."

तरीही दुसऱ्याच कोणा हृदयरोगतज्ज्ञांसाठी मी चिठ्ठी द्यावी याचा ते आग्रह धरतात. अर्थातच मी त्यांना बधत नाही. तीन चार हृदयरोगतज्ज्ञांची नावे सांगून, यापैकी कोणाहीकडे जा, असे सांगून मी त्यांची बोळवण करते. 

त्यानंतर एक-दोन महिने निघून जातात. त्या 'परीक्षक किंवा संशयात्मा फिरस्त्यां' चा मला तोपर्यंत विसर पडलेला असतो. एक दिवस पुन्हा तेच पालक माझ्याकडे येतात. मधल्या काळात त्यांनी अजून एक-दोन बालरोगतज्ज्ञ व त्यांनी सुचवलेल्या आणखी काही हृदयरोगतज्ज्ञांचीही ओपिनिअन्स घेतलेली असतात. त्यातल्या एक-दोघां तज्ञांनी, आधीच झालेल्या सर्व तपासण्या व काही नवीन तपासण्याही करून घेतलेल्या असतात. "बाळाच्या हृदयात असलेले भोक ऑपरेशन करून बंद करावे लागेल", असाच सल्ला सर्व हृदयरोगतज्ज्ञांनी दिलेला असतो. त्यामुळे साहजिकच मी त्यांना विचारते,

"आता ऑपरेशन करावे लागणार, हे तर निश्चितच झाले आहे ना? मग पुन्हा तुम्ही माझ्याकडे का आला आहात?'

"मॅडम, आम्ही दोन-तीन हृदयरोगतज्ज्ञांची ओपिनिअन्स घेतली. ऑपरेशन करावे लागणार असे सगळयांनी सांगितले. पण कोणाकडून आणि कुठे ऑपरेशन करून घ्यावे, हे तुम्ही सांगा."

सगळीकडे फिरून आल्यावर आता पुन्हा हे लोक माझं डोकं खाणार, या विचारांनी माझं डोकं चांगलंच तापतं.

कोणाकडून आणि कुठल्या हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन करून घ्यावे, हे ठरवण्यासाठी तुम्ही अजून चार-पाच ओपिनियन्स घ्या, असा सल्ला त्यांना देण्याचा दुष्ट विचार माझ्या मनात येतो. 
पण हीच ती वेळ असते जेंव्हा 'डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेऊन वैद्यकीय व्यवसाय करावा', हा माझ्या शिक्षकांचा सल्ला मला आठवतो. त्यामुळे मी त्या दुष्ट विचारांना आळा घालते. विचारमग्न झाल्याचे नाटक करते. त्यादरम्यान आलेला राग शांत करते, आणि त्यांना सांगते,

"अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज हॉस्पिटल, ऑपरेशनसाठी येणारा खर्च, तुमचा वैद्यकीय विमा, इत्यादी सर्व बाबी विचारात घेऊन काय तो निर्णय घ्या म्हणजे झाले."

त्यानंतर मात्र, अगदी महत्त्वाचे काहीतरी सांगत आहे असा आव आणून मी पुढे म्हणते,
"बाळाच्या हृदयाला भोक असल्याचे निदान ज्या बालरोगतज्ज्ञांनी सर्वात आधी केले होते, ते निष्णात बालरोगतज्ज्ञ आहेत. ऑपरेशननंतर तुम्ही नेहमी त्यांच्याकडेच बाळाला दाखवत राहा." असे सांगून मी या 'संशयात्म्यां'पासून स्वतःची सुटका करून घेते.

आपला नेहमीचा भाजीवाला, किराणा दुकानदार, शिंपी हेदेखील आपण बदलत नाही. पण हे 'फिरस्ते' पेशंट मात्र सतत डॉक्टर्स कसे काय बदलत राहतात,  याचे मला राहून-राहून आश्चर्य वाटते.

शनिवार, ७ मार्च, २०२०

नसता ताप !


रोजच्याप्रमाणे सकाळचे क्लिनिक आटपून मी घरी आले. जेवण होऊन आडवे होईपर्यंत जवळजवळ तीन वाजत आले होते. जरा डोळा लागला असेल नसेल तेव्हढ्यात माझा मोबाईल वाजला.

"हाय डॉक, मी पम्मी बोलतेय, आरवची मम्मी.."

वयाच्या आणि नातेसंबंधांच्या मर्यादा झुगारून,"हाय डॉक" "हॅलो डॉक" अशा अमेरिकन स्टाईलने माझ्याशी बोलायला सुरुवात करणाऱ्या मॉड मम्मी-डॅडींचा एरवीही तसा मला रागच येतो. आज तर माझी झोपमोड झाल्यामुळे माझ्या डोक्यात सणकच गेली होती. पण तो राग गिळून, आवाज शक्य तितका शांत ठेऊन मी विचारले,

" काय गं ? काय झालेय?"

"डॉक, आज ना सक्काळपासून आरवला ताप आलाय असं वाटतंय. तस तो काल रात्रीपासूनच जरा किरकिर करतोय. काल ना आम्ही त्याला बड्डे पार्टीला घेऊन गेलो होतो. तिथे तो खूप खेळला. सगळ्यांनी त्याला घेतलं  म्हणून किरकिर करत असेल असं आम्हाला वाटलं. पण आज सकाळीही सारखा रडतोय. हातात घेतलं की शांत होतो. पण खाली ठेवलं की रड-रड सुरू आहे ."

आपल्या  बाळाला जरा काही त्रास झाला की त्वरित डॉक्टरांना फोन करणाऱ्या आणि नंतर तासा-तासागणिक बाळाच्या प्रकृतीबद्दल फोनवर अहवाल कळवत राहणाऱ्या, उच्चशिक्षित मम्म्यांची एक नवीन जमात निर्माण झाली आहे. अशीच एक मम्मी, तिचं  बोलणं मी ऐकते आहे की नाही याचा अंदाज न घेताच पलीकडून भडाभडा बोलत राहिली,

"आरव आज सकाळपासून खूप किरकिर करतोय. काही नीट खात नाहीये. रोज सकाळी नऊ वाजता मी त्याला रव्याची खीर देते. तो मोठ्ठा बाउल भरून खीर खातो. पण आज दोनच चमचे खाल्ली आणि मानाच फिरवायला लागला. परत बारा वाजता वरण भाताच्या वेळी त्यानं तसंच केलं. मग  त्याच्या आजीने त्याला तूप-मेतकूट-भात कालवून खायला घालण्याचा प्रयत्न केला. पण एक घासही नाही खाल्ला. त्याला मॅगी आवडतं, म्हणून मग आम्ही मॅगी करून दिलं. पण तेही खात नाहीये, हे पाहिल्यावर आम्हाला खूप टेन्शन आलं, म्हणून मी लगेच तुम्हाला फोन केला. सॉरी हं डॉक, तुम्हाला झोपेतून उठवलं... "

आपलं मूल मॅगी खायला नकार देतेय म्हणजे निश्चित आजारी आहे असा निष्कर्ष हल्लीच्या मम्म्यां काढतात आणि त्यांना टेन्शन येतं! पम्मी आणि तिची सासू या दोघींना आलेलं ते टेन्शन रास्त आहे की नाही, याचा अंदाज घेण्यासाठी मी पम्मीला प्रश्न विचारायला सुरुवात केली,

"आरवने सकाळपासून अंगावरचे दूध घेतलंय का? त्याला सर्दी खोकला आहे का?

"हो, अंगावरचे दूध घेतो आहे. सकाळपासून तो दोनदा विचित्र आवाजांत खोकला आणि त्याचं नाक सारखं गळतंय"

या असल्या मम्म्यां म्हणजे, "घट्ट पिवळा शेंबूड येतोय" "तीन वेळा मेंदीच्या रंगाची शी केली" "दोन वेळा दह्यासारखी उलटी काढली" असले विशेष तपशील देण्यात मोठ्ठ्या तरबेज असतात.

" बरं एक सांग, त्याला ताप आला आहे असं तुला नुसतं वाटतंय का ताप खरंच आला आहे?"

"त्याचे हातपाय थंड आहेत पण डोकं गरम लागतंय. अजून आम्ही तसा मोजला नाहीये. पण ताप आहे असं आई म्हणाल्या."

आत मात्र माझं डोकं गरम व्हायला लागलं होतं आणि माझा आवाजही चांगलाच तापला असावा.

" घरी थर्मोमीटर आहे ना? मग आत्तापर्यंत ताप का मोजला नाही?  खरंच ताप आहे की नाही, किती ताप आहे,   किती-किती वेळाने चढतोय, हे सर्व मला फोन करायच्या आधी बघायला नको का?"

"खरंय डॉक. पण आम्हाला इतकं टेन्शन आलं होतं ना की काही सुचलंच नाही. आई म्हणाल्या म्हणून मग मी तुम्हाला लगेच फोन केला. मी पाचच मिनिटात ताप मोजून पुन्हा फोन करते."

पम्मीने सासूचं नाव पुढे करत आपली सुटका करून घ्यायचा प्रयत्न केला. पण माझ्या आवाजातली धार तिला जाणवली असावी. त्यामुळे तिने घाईघाईने फोन बंद केला.

तिचा फोन येईपर्यंत पाच मिनिटे वर्तमानपत्रे चाळावीत आणि पम्मीचा फोन झाल्यावर पुन्हा झोपावे असा विचार करून मी वाचत पडले. पण बराच काळ झाला तरी तिचा फोन आला नाही. त्यामुळे वर्तमानपत्र वाचता-वाचता  माझा डोळा लागला, तर पुन्हा पम्मीचा फोन !

"डॉक, इतका वेळ आम्ही दोघी ना त्याचा ताप घ्यायचा प्रयत्न करत होतो.पण तो जाम घेऊच देत नव्हता. म्हणून आधी फोन करू शकले नाही. दुपारी त्याला सांभाळायला बाई येतात ना, त्या आल्यावर, आम्ही तिघींनी मिळून आरवला कसंबसं पकडलं आणि ताप मोजला. त्याला आत्ता ९९.२ ताप आहे. सॉरी हं डॉक. तुमच्या दुपारच्या विश्रांतीच्या वेळी मी तुम्हाला खूप त्रास देतेय"

मला कितीही त्रास झाला असला तरी, "हो बाई, तुझ्या फोनचा मला खरच  त्रास होतोय" असं मी काही म्हणू शकत नव्हते. त्यामुळे शांतपणे मी तिला आरवच्या तापाबद्दल सूचना द्यायला लागले,

"त्याचं अंग जरा नळाच्या पाण्याने पुसून घ्या. त्याला भरपूर पाणी पाजवा.  ताप १०० च्या वर जायला लागला तर लागेल तसे पॅरासिटॅमॉलचे डोस द्या. हलका ताप आहे. तो खात  नसला तरी अगदी झोपून नाहीये. त्यामुळे बहुतेक हवाबदलाचा ताप असावा. एक-दोन दिवसांत जाईल निघून. ताप फारच वाढायला लागला,  किंवा दोन दिवसांत नाहीच गेला, किंवा इतर काही लक्षणे दिसायला लागली, तर मला कळवा "

" संध्याकाळी त्याला एकदा क्लिनिकवर घेऊन येऊ का डॉक? एकदा  तुमचा हात लागला की आमचं टेन्शन उतरून जाईल"

जणू काही आरवचा ताप उतरण्यापेक्षा पम्मीचं आणि तिच्या सासूचं टेन्शन उतरणं जास्त महत्त्वाचे होते. त्यातून  तिने असा काही सूर लावला होता की माझा हात लागताच त्या आरवचा ताप आणि या दोघींचं टेन्शन उतरणार होतं.

" हलका ताप आहे आणि आरव अंगावरचे दूध  घेतोय. त्यामुळे इतकं टेन्शन घेण्यासारखे काही नाही. चोवीस तास तरी वाट बघा. नाहीच बरं वाटलं तर क्लिनिकला घेऊन या"

मी निक्षून सांगितल्यामुळे पम्मीने नाईलाजाने फोन ठेवला. पण त्या वेळेपासून पुढचे चोवीस तास तिने मला भलताच ताप दिला. दर तासागणिक व्हॅट्सऍप मेसेजेस पाठवत राहिली. तो मेसेज पाहून मी उत्तर दिले नाही की मग ती मला SMS वर तीच माहिती अथवा प्रश्न पाठवत राहिली. त्याला उत्तर दिले नाही की दर तीन-चार तासाने तिचा किंवा तिच्या सासूचा मला फोन येत राहिला. काही विचारू नका.

"डॉक, आरव आत्ता दोन वेळा खोकला. आता ताप ९९.४ आहे. एकदा उलटी झाली. अर्धच बिस्कीट खाल्लं. तीन शिंका आल्या. नाक बंद झालंय असं वाटतंय. ताप ९९.१ वर आलाय " अशी जणू रनींग कॉमेंट्रीच त्या पम्मीने चालू ठेवली होती.

इतकंच नव्हे तर या काळात पम्मीला आणि त्या आरवच्या पप्पांच्या मम्मीला पडलेले अनेक प्रश्न आणि शंका  विचारण्याचा त्या दोघीनीं सपाटा लावला होता.

"सगळे अंग पुसून घ्यायचे का फक्त कपाळावर पाण्याच्या पट्ट्या ठेवायच्या? त्या पाण्यात 'यु दी कोलोन' घालायचे का ? थर्मामीटर काखेत लावायचा का जांघेत? डिजिटल थर्मामीटर चांगला का मर्क्युरी थर्मोमीटर जास्त चांगला? ताप मोजताना डिजिटल थर्मामीटरच्या रीडिंगमध्ये एक मिळवायचा का वजा करायचा? पॅरासिटॅमॉलचे ड्रॉप्स जास्त चांगले का सिरप? अमुक कंपनीचं पॅरासिटॅमॉल चांगले का तमुक कंपनीचं जास्त चांगले? पॅरासिटॅमॉल पेक्षा स्ट्रॉंग औषध देऊ का? तापासाठी  होमिओपॅथीचे औषध दिलं तर चालेल का ? त्याचा ताप डोक्यात तर जाणार नाही ना? आरवच्या छातीला व्हिक्स लावू का?  ताप उतरावा म्हणून मॉलीशवाल्या बाईंनी अंगारा आणलाय, तो लावला तर चालेल का? त्याला दृष्ट लागल्यामुळे  ताप आला असेल का? आरवची दृष्ट काढू का ?

असले अनेक प्रश्न, कधी पम्मी आणि कधी पम्मीची सासू, फोनवर विचारत किंवा पाठवत राहिल्या.

शेवटी मी, "आरवला दाखवायला संध्याकाळी क्लिनिकला घेऊन या" असं सांगितल्यावरच फोनवरचा हा दुहेरी 'ताप' थांबला.

संध्याकाळी आरवला घेऊन पम्मी, पम्मीचा नवरा, त्याची मम्मी आणि आरवला सांभाळायला ठेवलेली बाई, असा संपूर्ण ताफा माझ्या क्लिनिकमध्ये पोहोचला. पम्मीच्या नवऱ्याच्या कडेवर आरवला छान आनंदात खिदळताना आणि खेळताना बघून मी म्हणाले,

"चांगला खेळतोय की. एखादा दिवस जरा वाट बघायची होतीत ना. गेला असता  ताप  निघून"

पम्मी जरा खजील झाली असं मला वाटलं, पण प्रत्यक्षांत मात्र भलत्याच कौतुकभऱ्या स्वरांत म्हणाली,

"नेहमी हा असंच  करतो. घरी आम्हा दोघींना अगदी घाबरवून सोडतो आणि इथे तुमच्यासमोर येऊन खेळतो. आमची अशी फजिती करतो. खरंय की नाही हो आई?"

सुनेने आपली साक्ष काढलेली पाहताच पम्मीच्या सासूनेही मानेने दुजोरा देत बोलण्याची सूत्रे आपल्या हातात घेतली.

"आहे ना ताप त्याला? तुमच्याकडे यायचं म्हणून मी मुद्दाम आत्ताचा पॅरासिटॅमॉलचा डोस त्याला दिला नाही"

मी आरवला तपासताना त्याला ताप असायला हवा, यासाठी पम्मीच्या सासूने ही दक्षता घेतली होती. तिच्या त्या हुशारीचं मी माफक कौतुक करावे, अशी तिची अपेक्षा असावी. पण अर्थातच तसं  काही घडले नाही. जणू त्याचा वचपा काढण्यासाठी, पुढची पाच मिनिटे पम्मीच्या सासूने, गेल्या चोवीस तासांतली आरवच्या तापाची गाथा, अनेक नवनवीन तपशिलांसह  माझ्यापुढे वाचली. पम्मीकडून मला आधीच मिळालेली सगळी माहिती, स्वतः सांगितल्यावरच पम्मीची सासू गप्प बसली. तिचे सगळे बोलणे मी लक्ष देऊन ऐकतेय, असे मी दाखवत राहिले. आणि डॉक्टरांनी माझं म्हणणे ऐकून घेतलं  याचं समाधान तिच्या चेहऱ्यावर झळकल्यावरच मी आरवला तपासायला लागले.

मी शांतपणे आरवला तपासत असताना, तो मात्र मासळीसारखा उसळत होता,खिदळत होता आणि खेळकरपणे आरडाओरडा करत होता.

"अगदी हलका ताप आहे. घाबरण्यासारखे काही वाटत नाहीये. मी कालपासून फोनवर सांगतेय त्याप्रमाणे हवाबदलाचा ताप आहे हा. याला आम्ही व्हायरल इन्फेक्शन असे म्हणतो. एक दोन दिवसांत व्हायरस बाळाच्या शरीरातून आपला आपणच निघून जातो. तसं झालं की ताप उतरून जाईल. त्याला भरपूर पाणी देत राहा. अंगावरचं दूध पाजवत राहा. सगळं खायला द्या. नेहमीपेक्षा थोडं कमी खाईल. पण एक दोन दिवसांत पूर्वीप्रमाणे खायला लागेल."

पुढच्या दहा मिनिटांत पम्मी आणि तिच्या सासूने, आधी फोनवर विचारलेले सगळे प्रश्न आणि अनेक नवीन उपप्रश्न विचारून माझ्या डोक्याला भलताच ताप दिला. हे सगळे झाल्यावर, पम्मीने अत्यंत स्मार्टपणे, तिच्या स्मार्टफोनवर, मला विचारण्यासाठी टिपून ठेवलेल्या प्रश्नांची यादी काढली. त्यात मला विचारून न झालेले एक दोन प्रश्न तिला मिळालेच. मग त्याची उत्तरे मी देणे हे ओघानेच आले.

" अँटिबायोटिक द्यायला नको का ? माझ्या फ्रेंडच्या मुलीला असाच ताप आला होता तेंव्हा तिच्या पेडियाट्रिशियनने जे अँटिबायोटिक दिले होते ते देऊन पाहायला काय हरकत आहे? "

मी "नको" असे उत्तर दिल्यावर,

" मग त्या पेडियाट्रिशियनने माझ्या फ्रेंडच्या मुलीला ते का दिले होते?'

मला अडचणीत टाकणारे असले प्रश्न विचारून आणि त्यांची समर्पक उत्तरे  द्यायला लावून पम्मीने माझी पुरती दमछाक केली.

हे सगळे झाल्यावर  सासूकडे बघत पम्मीने विचारले,

"आई आजून काही विचारायचं राहिलं नाही ना?"

पम्मीच्या सासूने नकारार्थी मान हलवल्यावर पम्मी नवऱ्याकडे वळाली,

"तुला काही विचारायचं आहे का? नंतर मग घरी गेल्यावर तुझ्या लक्षात येईल, त्यापेक्षा काही विचारायचे असल्यास आत्ताच काय ते विचार "

बायकोने केलेला हलकासा अपमान मूग गिळून सहन करत, पम्मीच्या नवऱ्याने नकारार्थी मान हालवली आणि मगच  पम्मी शांत झाली.

आरवचा ताप, पुढचे अठ्ठेचाळीस तास टिकला. पण त्या काळांत, पम्मीने आणि तिच्या सासूने फोनवर चालू ठेवलेल्या तापामुळे माझं डोकंच नाही तर माझा फोनही चांगलाच गरम होत होता.

चौथ्या दिवशी सकाळी-सकाळी मी साखरझोपेत असताना माझा फोन वाजला. पलीकडून पम्मी बोलत होती.

"डॉक सहा तास झाले. पण आरवला तापच नाही आला"

आत आरवला ताप न आल्याचे पम्मीला टेन्शन आले आहे असे वाटावे, असाच तिचा सूर होता!

" चांगले झाले ना मग. आता तरी तुझं टेन्शन गेलं ना? " मी विचारले

" हो तसं आत्तापुरतं गेलंय." असं म्हणून ती थांबली. मी डॉक्टर नसून एखादी ज्योतिषी असल्यासारखे तिने पुढे मला विचारले,

" परत आरवला ताप तर येणार नाही ना ? हा विचार करूनच आम्हाला दोघींना खूप टेन्शन येतंय. डॉक परत असा ताप येणार नाही ना त्याला ? "

वैद्यकीय शास्त्राच्या ऐवजी आपण ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करायला पाहिजे होता असा विचार माझ्या मनाला चाटून गेला. आत वैद्यकीय शास्त्राचा अभ्यास केलाच आहे तर निदानपक्षी या मॉडर्न मॉम्सच्या आणि त्यांच्या सासवांना येणारं "टेन्शन" या विषयावर  संशोधन करावे आणि टेन्शन येणार नाही किंवा आलेच तर ते लगेच घालवता येईल, यासाठी काही नामी उपाय शोधावा, असंही वाटून गेलं. पण हे आपलं सगळं मनातल्या मनांत. प्रत्यक्षात मात्र मी पम्मीला धीर देत म्हणाले,

"आता बरा झालाय ना तो. मग  कशाला उगीच काहीतरी विचार करताय ? आता तो नीट खायला लागेल.  त्याला भरपूर खायला प्यायला घाला. वेळच्यावेळी डोस द्यायला आणा म्हणजे झालं. "

आरवला ताप आलेला असतानाच्या तीन दिवसांच्या काळांत,  मला त्रास दिल्याबद्दल पम्मी फोनवर मला दहा वेळा सॉरी म्हणाली. त्या काळांत तिने आणि तिच्या सासूने दिलेला 'ताप', मी  शांतपणे सहन केल्याबद्दल, मला अनेक वेळा थँक्यू म्हणत, पम्मीने  फोन ठेवला.

मी हुश्श म्हणत पुन्हा निद्रादेवीच्या आधीन झाले असेन-नसेन इतक्यांत पुन्हा माझा फोन वाजला,

"हॅलो डॉक्टर, मी प्रेमची मम्मी बोलतेय. प्रेमला ना, काल रात्रीपासून ताप आलाय असं वाटतंय. ... "

माझ्या साखर झोपेचं पाणी पाणी झालं आणि  पुढचे बहात्तर तास पुन्हा एक "ताप" सहन करायला मी सज्ज झाले!










शनिवार, २९ फेब्रुवारी, २०२०

कपडे काढण्याचे पैसे!

मी बालरोगतज्ज्ञ झाले आणि दोन वर्षांत आमची बदली अलाहाबादला झाली. त्यावेळी अलाहाबाद अगदीच मागासलेले शहर होते. तिथल्या लोकांना स्री डॉक्टर ही फक्त स्त्रीरोगतज्ज्ञ अथवा प्रसूतीतज्ज्ञच असते असे वाटायचे. त्यामुळे, "इस बार माहवारी नही आई, आप हमें कुछ गोली-इंजेक्शन नहीं देंगे क्या? आप सिर्फ बच्चाको देखेंगी क्या?" असल्या प्रश्नांना उत्तरे देत बसावे लागायचे. कदाचित असेही असेल की बालरोगतज्ज्ञ नामक काही विशेष पदवी असते याची तिथल्या आम जनतेला त्यावेळी कल्पनाच नसावी. संपूर्ण अलाहाबादमध्ये त्यावेळी एखादे-दुसरेच बालरुग्णालय अस्तित्वात होते. सुरुवातीला मला बालरोगतज्ज्ञ म्हणून प्रॅक्टिस करायला जरा अडचण यायची. पण मी अलाहाबादच्या सिव्हिल लाईन्स या ठिकाणी माझी प्रॅक्टिस सुरू केली होती. माझ्या सुदैवाने तिथे उच्चशिक्षित व उच्चभ्रू लोकांची वस्ती होती. ते बालरोगतज्ज्ञांचे महत्त्व जाणून होते. त्यामुळे हळूहळू माझ्याकडे बालरूग्ण तपासणीसाठी आणले जाऊ लागले.

माझ्या दवाखान्याची वेळ मी सकाळी ९ ते दुपारी २ पर्यंत ठेवली होती. सुरुवातीला मी संध्याकाळीही जायचे. पण "हमारे यहां शामके वक्त बाहर निकलना महिलाओंके लिये असुरक्षित है| शामको आप बाहर मत निकला करिये|" असा प्रेमळ सल्ला मला तेथील अनेक हितचिंतकांनी दिला. त्यामुळे संध्याकाळी एखादा पेशंट असेल तर मी घरीच तपासणी करू लागले. अर्थात सुरूवातीच्या काळात सकाळचाही बराचसा वेळ पेशंट्स येण्याची वाट बघण्यातच जायचा, हेही खरे. माझ्या क्लिनिकमध्ये आणि घरीही टेलिफोन होता. त्यामुळे लोक फोन करूनही आपल्या बाळांना माझ्याकडे घेऊन यायचे. 

अलाहाबादला नोव्हेंबर ते जानेवारी अखेरपर्यंत कडक थंडी असायची. फेब्रुवारी महिन्यांत हळूहळू थंडी कमी व्हायला लागायची. थंडीत भूकही खूप लागायची. साधारण १९९३-९४ च्या फेब्रुवारी महिन्यातली ही गोष्ट असावी. मी सकाळपासून क्लिनीकमधे नुसतीच बसून होते. दोन वाजेपर्यंत भुकेने माझ्या पोटात कावळे ओरडू लागले होते. आता क्लिनीक बंद करून घरी जाऊन जेवावे, असा विचार करत असतानाच क्लिनीकचा फोन वाजला. "डाक्टर मैडम, आप अभी बैठी हैं क्या? हमारा बबुआ एक घंटेसे बहुतही रो रहा है| शांतही नहीं हो रहा| आप तनिक रूकिये, हम अभी आते है|"


माझ्या पोटात कावळे कोकलत असले तरीही त्यांच्या कोकलणाऱ्या बाळाला तपासण्याशिवाय मला पर्याय नव्हता. थोड्याच वेळात एका मोठ्या गाडीतून बाळाला घेऊन बाळाचे आई-वडील आणि आजी-आजोबा आले. बाळ बेंबीच्या देठापासून केकाटत होते. मी एक-दोन वर्षांपूर्वींच बालरोगतज्ज्ञ झालेले असल्याने माझे पुस्तकी ज्ञान ताजे होते. त्यामुळे बाळाला मेंदूज्वर, मेंदूतील रक्तस्त्राव, सेप्सिस किंवा इतर काही गंभीर आजार झाला असावा, असा अंदाज मी मनातल्या मनात केला. असला कुठला गंभीर आजार बाळाला असल्यास, त्याला कुठे ऍडमिट करायचे? आणि अपुऱ्या वैद्यकीय सेवा असलेल्या या शहरात बाळाचा इलाज कसा काय करायचा? या भीतिने माझ्या पोटात गोळा उठला. तरीही मनावर काबू ठेवत मी बाळाला तपासण्यासाठी टेबलवर ठेवायला सांगितले आणि बाळाच्या आईला बाळाचे कपडे काढायला सांगितले.

बाळ रडत असल्याने त्यांच्यापैकी कोणालाच काही सुचत नव्हते. बाळाचे रडणे थांबावे यासाठी बाळाचे बाबा बाळाच्या कानाजवळ खुळखुळा वाजवत होते, आजोबा टाळ्या वाजवत होते आणि आजी तोंडाने वेगवेगळे आवाज काढून दाखवत होती. बाळ रडत होते आणि उसळ्या मारत होते. भांबावलेल्या आईला बाळाचे कपडे काही पटापटा काढता येईनात. मग तिला बाजूला सारून मीच ते काम हाती घेतले. एकेक करून मी बाळाचे कपडे काढायला सुरुवात केली. एकावर एक असे तीन-चार स्वेटर्स, दोन लांब हाताची झबली, एक सुती आणि दोन लोकरीच्या टोप्या काढल्यावर बाळाच्या अंगावर एक सुती बंडी फक्त उरली. गंमत म्हणजे जसजसे मी एकेक आवरण काढत गेले तसतसे बाळ हळूहळू शांत होत गेले व शेवटी चक्क हसायला लागले. तरीही आपल्याकडून वैद्यकीयदृष्ट्या काही राहायला नको हे मनात ठेवून मी त्या बाळाला नीट तपासले. थंडी कमी झालेली असतानाही बाळाला आवश्यकतेपेक्षा जास्त गरम कपडे घातलेले असल्यानेच बाळ रडत होते हे निश्चित झाले. त्यामुळे फक्त त्या बाळाचे कपडे काढण्याचे पैसे मला मिळणार आहेत हे मला समजले. संपूर्ण तपासणी केल्यावर बाळाला विशेष काहीही झालेले नसल्याची ग्वाही मी त्यांना दिली. त्याशिवाय बाळाच्या स्वच्छतेबाबत, लसीकरणाबाबत व आहाराबद्दल सल्लाही दिला. तसेच, आता थंडी ओसरू लागली आहे, त्यामुळे बाळाला फारसे गरम कपडे घालण्याची आवश्यकता नाही हे सांगून, माझी तपासणी-फी घेऊन त्यांची बोळवण केली.

सांगायचा मुद्दा असा की आता फेब्रुवारी महिना संपलाच आहे. तशीही आपल्याकडे फारशी थंडी पडतच नाही. आता तर चांगलच गरम व्हायला लागले आहे. त्यामुळे तुमच्या बाळाला जरूरीपेक्षा जास्त गरम कपडे घालू नका आणि ते कपडे काढण्यासाठी माझ्याकडे आणून माझा खिसा गरम करू नका !